पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठा यांचं नियोजन कराव्या असे निर्देश राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगाम अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे येथे आज संपन्न झाली.
या बैठकीस अपर मुख्य सचिव (कृषी) श्री. विकासचंद रस्तोगी, कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे, प्रकल्प संचालक (पोक्रा) श्री. परिमल सिंग, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती भुवनेश्वरी, प्रकल्प संचालक (स्मार्ट) डॉ. हेमंत वसेकर, महासंचालक (महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद) श्रीमती वर्षा लढ्ढा, तसेच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील प्रकल्प संचालक (आत्मा) उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खतं, पाणी उपलब्धता, हवामानातील बदल, तसेच विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या धरणं व विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही. परिणामी, रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणं, खतं व निविष्ठांचं नियोजन करण्यात येणार आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु