रत्नागिरी, 17 ऑक्टोबर, (हिं. स.) : महिला व बालकल्याण विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण तालुक्यात राबविलेल्या “पोषण महा” आणि “बेटी बचाव, बेटी पढाव” उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ढोक्रवली, उमरोली, दुर्गेवाडी आणि चिंचघरी या गावांमध्ये “पोषण महा” आणि “बेटी बचाव, बेटी पढाव” या उपक्रमांतर्गत माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना ग्रामस्थ, महिला व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
बालविकास प्रकल्प कार्यालय एक व दोन यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्यांमध्ये सध्या पोषणमहाच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम सातत्याने घेतले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये स्तनदा माता, गर्भवती माता, किशोरवयीन मुली तसेच लहान मुलांसाठी पोषणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. संतुलित आहार, अन्नातील पोषणमूल्ये आणि आरोग्यदायी सवयी या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती दिली गेली.
या कार्यक्रमांना संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन दिले. “बेटी बचाव, बेटी पढाव” अभियानांतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, आणि समाजात “मुलगी असणं हे अभिमानाचं प्रतीक आहे” हा सकारात्मक संदेश रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुलींच्या जन्मदरात वाढ आणि स्त्री-समानतेचा विचार समाजात दृढ व्हावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. प्रीती शिवगण व सौ. सुनीता नायकोडे संरक्षण अधिकारी श्रीमती माधवी जाधव उपस्थित होत्या. ढोक्रोली व दुर्गेवाडी बीटच्या मुख्य सेविका सौ. रेखा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी ग्रामस्तरावर महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, पोषणविषयक माहिती तसेच कायदेविषयक मार्गदर्शन पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडले.
या उपक्रमांद्वारे समाजात महिलांच्या सक्षमीकरणाचा, बालआरोग्य जागृती, बेटी बचाव बेटी पढाओ, महिलांविषयी कायदे हिंसा अत्याचार सहन करू नये, हा सकारात्मक सामाजिक बदलाचा संदेश पसरत आहे. गावोगावी राबविले जाणारे हे कार्यक्रम ग्रामविकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याचे एक सक्षम उदाहरण ठरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी