सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमी वर ते भाजपा जाणार का? या चर्चेला उधाण आले असून, पाटील यांच्या चिरंजीवांनी सोशल माध्यमावर केलेली पोस्ट व त्या खालील कमेंट्स पाहता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेत तथ्य असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसा पूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी माझे जो काम करेल त्याच्या सोबत मी जाणार या त्यांच्या वक्तव्याची प्रचिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भाजपाची सुभेदारी किंवा त्यांची शिस्त राजन पाटील यांच्या पचनी पडणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
माजी आमदार पाटील हे धुरंदर राजकारणी म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत. मोहोळ विधानसभा मतदार संघावर त्यांचा गेल्या 40 वर्षा पासून वरचष्मा होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते मंडळीची मोट बांधून त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला. मात्र राजन पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला तर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड