पुणे, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजित करण्याचे कामकाज सुरू होणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना मतदार यादी विभाजित करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी मतदार यादी विभाजनाबाबत प्रशिक्षण दिले.
यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक प्राधिकृत अधिकारी किरणकुमार मोरे, नगररचना सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंते, निवडणूक कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि प्रगणक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघाची १ जुलै २०२५ ची अंतिम मतदार यादी गृहित धरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यानुसार मतदार याद्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन केले जाणार आहे. यासाठी नेमलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी समन्वयाने काम करावे. हे काम महत्वाचे आणि जबाबदारीचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार विहित वेळेत हे कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा सूचना जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या. कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या कालावधीत रजा दिली जाणार नसून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध नियमाधिन कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कामकाजासाठी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी तसेच प्रत्यक्ष स्थळ भेटीसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक व योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु