‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची सहकार्याची तयारी
मुंबई, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक आजाराबाबत समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी शासनाला
Actor Jackie Shroff ready to collaborate with 'Thalassemia Mukt Maharashtra


मुंबई, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक आजाराबाबत समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

जॅकी श्रॉफ हे गेल्या काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसिमिया विषयावर सातत्याने कार्यरत असून, या आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

थॅलेसिमिया या गंभीर आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्था, संघटना, प्रतिष्ठित नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन कार्य करणे अत्यावश्यक आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे आणि या आजाराविषयी सर्वसामान्यांमध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी सांगितले.

‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या राज्य शासनाच्या अभियानासाठी अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्याबाबत या भेटीत अनौपचारिक चर्चा झाली. या भेटीवेळी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ.पुरुषोत्तम पुरी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande