खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास
नांदेड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ हा मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे लवकरच होवू घातलेल्या या मतदार संघाच्या
निवडणुक अनुषंगाने विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सद्द्या सुरू असलेला दिवाळी आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करावी. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला आहे.
आगामी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यावतीने आज कुसुम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर नाव नोंदणी अभियान प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदार संघाच्या आ.ऍड.श्रीजया चव्हाण, भाऊराव चव्हाण साखर उद्योग समूहाचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा सहसंयोजक संजय केनेकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस किरण पाटील, भाजपचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, भाजपचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले,चैतन्यबापू देशमुख, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक विजय येवनकर यांच्यासह भाजपचे सर्व तालुकाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.
खा.अशोकराव चव्हाण यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, देशातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चारही सभागृहात काम करण्याची मला संधी मिळाली.महाराष्ट्राच्या विधान परिषदेत यापूर्वी डायगव्हाने, बी.टी.देशमुख यांच्यासारखे अभ्यासू आणि लढावू बाण्याचे आमदार झाले आहेत. लवकरच होवू घातलेल्या पदवीधर मतदार संघ निवडणूक अनुषंगाने मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने काम करणे गरजेचे आहे.सद्या सुरू असलेल्या दिवाळी उत्सवाची धामधूम लक्षात घेऊन प्रत्येकाला केवळ दहा पदवीधर मतदारांची नावनोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरीही जास्तीत जास्त पदवीधर नावनोंदणी करावी, जेणेकरून पुढील निवडणुकीत त्यांना प्राधान्यक्रमाने संधी देण्यात येईल.
राज्यातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
आपल्या पक्षाला अधिकाधिक मताधिक्याने विजयी करायचे आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आपल्या भारताची बाजू जगभरात भक्कम झाली आहे. विकसित भारत निर्माण करण्यासाठी वेगाने विकास कामे सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत आली आहे. तसेच नांदेड येथून आजघडीला पाच विमाने सुरू असून पुढील नोव्हेंबर महिन्यापासून राजधानी मुंबई येथे नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्णत्वास नेणारा मी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी तळमळीने काम करणारे नेते आहेत. सार्वजानिक हिताचे कोणतेही विकासकाम ते अगदी त्वरेने मार्गी लावतात हा माझा अनुभव आहे.
देशाचे माजी केंद्रिय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे सर्वजण अतिशय निष्ठावान आणि प्रामाणिकपणे काम करणारे असल्याने या शिक्षण संस्थेचा सर्वत्र नावलौकिक होतो आहे. त्यामुळे या अभियानात देखील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करुन महत्त्वाचे योगदान देतील. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर संयोजक भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शारदा भवन शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी येत्या ३० ऑक्टोबर पूर्वी प्रत्येकांनी किमान दहा पदवीधर मतदार नाव नोंदणी करावी.पदवीधर मतदार संघासाठी आपल्या जिल्ह्यातून दहा हजार नाव नोंदणीचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,भाऊराव चव्हाण साखर उद्योग समूहाचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश चिटणीस किरण पाटील, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांचीही यावेळी समायोचित
भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis