नांदेड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)।
भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला आपल्या गावाकडे जाऊन आनंद उत्सव साजरा करता यावा या अनुषंगाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नांदेड- हडपसर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडावेत अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. या मागणीला यश आले असून नांदेड हडपसर या दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दिवाळीनिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्ये रेल्वेने नांदेड हडपसर नांदेड विशेष गाडी लातूर मार्गे चालविण्याचे जाहीर केले आहे. यासाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे. नांदेडसह मराठवाड्यातील लाखो कर्मचारी, कामगार ,विद्यार्थी ,व्यापारी पुणे आणि पुणे परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु दिवाळी सण साजरा करण्यासाठी ही सर्व मंडळी आपापल्या गावाकडे येत असतात. पुणे येथून नांदेड अथवा मराठवाड्यात येण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करणे आर्थिक दृष्ट्या खर्चिक आणि जिकीरीचे असल्याने या प्रवाशांना सुखरूप प्रवास करता यावा यासाठी नांदेड - हडपसर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत केंद्रीय रेल्वेमंत्र्याने नांदेड - हडपसर या मार्गावर रेल्वेच्या दोन विशेष गाड्या सोडत या गाड्यांच्या चार फेऱ्या करण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार गाडी क्रमांक 07607 हुजूर साहेब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुटेल . सदर रेल्वे पूर्णा - परभणी -गंगाखेड- परळी -लातूर रोड- लातूर -धाराशिव -बार्शी शहर- कुरूडवाडी - दौंड मार्गे हडपसर येथे रात्री नऊ वाजून 40 मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 7608 ही हडपसर ते हुजूर साहेब नांदेड विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोबर आणि दिनांक 28 ऑक्टोबर रोजी मंगळवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून रात्री 10 वाजून 50 मिनिटाला सुटणार असून ती दौंड- लातूर -परळी - परभणी मार्गे हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटाला पोहोचणार आहे . या गाडीला एकूण 22 डबे असणार आहेत . त्यामुळे पुणे येथून नांदेडकडे आणि मराठवाड्यात येणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांना आणि दिवाळी साजरी करणाऱ्या बांधवांना खा. डॉ. अजित यांच्या प्रयत्नामुळे दिवाळीच्या प्रवासाचा गोड आनंद घेता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis