बीड - मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाच्या बैठकीत गेवराईचे प्रश्न निकाली निघणार
बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात पैठण उजव्या कालव्याशी संबंधित कामांच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती गेवराईचे आमदार
17d27a6f42ce4c914d7ab44a195c0d25_1907274578.jpg


बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात पैठण उजव्या कालव्याशी संबंधित कामांच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. लवकरच हे प्रश्न निकाली लागतील असे ते म्हणाले.

पैठण उजव्या कालव्यातून आपत्कालीन परिस्थितीत पाणी सोडण्यासाठी मौजे कोल्हेर आणि मौजे रोहितळ शिवारातील पेपर मिल जवळ कापशी नदीच्या काठावर काट नियामक (क्रॉस रेग्युलेटर) बसविणे संदर्भात चर्चा होऊन त्यास मंजुरी देणे संदर्भात कार्यवाही झाली. पैठण उजव्या कालव्यामुळे वाहतुकीस सतत अडथळा निर्माण होत असलेल्या ठिकाणी रहदारीसाठी पूल बांधकाम करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. मौजे टाकरवन, मौजे सेलू आणि महाडिक वस्ती, टाकळगव्हाण येथे पुलाचे बांधकाम करणेबाबत अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.

सिंदफणा नदीवरील सिरसमार्ग निम्नपातळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील मौजे सिरसमार्ग ते बहादरपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम आणि मौजे सिरसमार्ग ते दिमाखवाडी रस्त्याचे बांधकाम करणेबाबत यावेळी आग्रही मागणी केली. जायकवाडी टप्पा दोन मधून ही कामे प्रस्तावित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत करण्यात आला.पैठण उजव्या कालव्यावरील वितरीकांची दुरुस्ती तसेच इतर स्ट्रक्चर च्या संदर्भातील दुरुस्तीची कामे तातडीने करणे बाबतची सूचना आजच्या बैठकीत केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी संबंधित वरील अतिशय महत्त्वाच्या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाले. या बैठकीला कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता श्रीमती सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता श्रीमती पल्लवी जगताप, अधीक्षक अभियंता श्री. इलियास चिस्ती यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande