मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठक
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस लातूर शहर व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वतयारी व आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी आयटीआय परीक्षा देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या मदीया कबीर सय्यद आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या रिजवान शेख यांचा सन्मान करण्यात आला. आपण सर्वजण जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि परिवर्तनासाठी एकत्र आलो आहोत. आता आपल्या लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत.
या निवडणुका म्हणजे फक्त उमेदवारांची परीक्षा नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठेची, समर्पणाची आणि संघटनशक्तीची खरी कसोटी आहे. आपला पक्ष हा पुरोगामी विचारांचा असून त्या विचारांना बांधील राहून आपण सर्वांनी नव्या जोमाने नव्या ताकतीने काम करण्याची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे. फक्त दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती बळकट आहे हे दाखवून देण्याची हीच ती सुवर्णसंधी असून आपण सर्वांनी जोमाने कामाला लागावे. प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता जागा असला पाहिजे. कारण बूथ जिंकला म्हणजे निवडणूक जिंकली. बूथ हेच आपल्या विजयाचं मूळ केंद्र आहे. असे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले
प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली सर्व ताकद लावून ही निवडणूक आपल्याला पूर्णपणे जिंकायची आहे. हा विजय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा असेल हे लक्षात असू द्या. लातूर जिल्हा परिषदेचे 58 गट होते. पण आगामी निवडणुकीसाठी एक गट वाढून ही संख्या आता 59 झाली आहे. तसेच पंचायत समितीच्या 118 गणासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लातूर महानगरपालिका, सर्वच मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्याच ताकतीने आपल्याला लढायचे आहे. आपल्या सर्वांचा एकच अजेंडा असला पाहिजे तो म्हणजे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय! असे ते म्हणाले.
सक्षम उमेदवार देऊन लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वांना विचारात घेऊन निवडणूक जिंकण्याचा निर्धार करूया. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रत्येकाने आपापली ताकद दाखवण्याची आणि एकजुटीने पक्षाला जिंकून आणण्याची धमक आपल्या सर्वांमध्ये आहे. उमेदवारांची चाचणी सुरू असून सक्षम उमेदवारांना आपण उमेदवारी देणार आहोत. यामध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होण्याचे कारण नाही. कारण पक्ष म्हणून आणि परिवार म्हणून काम करत असताना आपण त्याला जिंकून आणण्याचे काम प्रामाणिकपणे करा.
काही ठिकाणी अडीअडचणी येतील परंतु त्या दूर करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. आपल्या कार्यकर्त्यांनी फक्त प्रचारात सहभागी होऊ नये, तर त्या त्या बूथवर मतदारांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, वृद्धांना मदत करावी, नवीन मतदारांची नोंद तपासावी, आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवावे. प्रत्येक बूथवर आपला संवाद, आपली संघटना आणि आपली ताकद दिसली पाहिजे. नगरपरिषद असो वा ग्रामपंचायत, प्रशासनाची दिशा ठरवणारा निर्णय बूथवरच घेतला जातो. आपण जर एकजुटीने, नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने काम केलं तर आपल्या विचारधारेचा विजय नक्की होईल. असे त्यांनी मांडले
प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, मराठवाडा विभाग शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, ग्रामीण कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुश नाडे, प्रदेश सरचिटणीस ऍड. व्यंकटराव बेंद्रे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis