पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेला धमकावून नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि साथीदारांनी ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घायवळसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका शाळेतील क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका खासगी कंपनीतील संचालक महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर, बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु