बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
आष्टी तालुक्यातील बावी येथील तरुण शेतकरी स्व. राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (३९) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी गर्कळ आणि वनपरीक्षेत्र अधिकारी मुंडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधमोहीम राबवून मध्यरात्री मृतदेह शोधून काढला.
या घटनेनंतर आमदार सुरेश धस यांनी संबंधित वन विभाग व प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. निधीअभावी अडचण निर्माण झाल्याने वनविभागीय अधिकारी व वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी .वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून तातडीची मदत मंजूर करून घेतली.
आज दहा लाख रुपयांची तातडीची मदत आज स्व. गोल्हार यांच्या पत्नी सौ. कौशल्या गर्जे यांना सुपूर्त करण्यात आली असून, उर्वरित १५ लाख रुपयांची मुदत ठेव रक्कम (५ वर्षांसाठी) दोन दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल. शासनाची आर्थिक मदत झालेली जीवितहानीची भरपाई करू शकत नाही, परंतु कुटुंबासाठी आधार ठरेल. या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा शब्द आहे. असे आमदार धस म्हणाले.
याप्रसंगी वन विभागचे विभागीय वन अधिकारी गर्कळ , वनपरीक्षेत्र अधिकारी मुंडे , माजी सभापती लक्ष्मण ननवरे, नवनाथ गर्जे तसेच बावी-दरेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis