पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक सव्वासात लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनुसार यात आणखी किमान तीन लाख हेक्टरची वाढ होऊ शकते. त्यामुळे अंतिम नुकसानीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला होता. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा घास या अतिवृष्टीने हिरावून नेला. शेती पिकांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जमीनही खरवडून गेल्याने शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला.
राज्य सरकारने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या एकत्रित पंचनाम्यानुसार राज्यात ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाले होते. त्यामुळे या जिल्ह्यांमधील बाधितांच्या अतिरिक्त एक हेक्टरचा समावेश या पंचनाम्यामध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीत आणखी किमान तीन लाख हेक्टरची वाढ होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु