रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। म्हसळा पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत सभापती पद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले असले तरी, समितीच्या गणनिहाय सदस्य आरक्षणात त्या प्रवर्गातील एकही जागा राखीव नसल्याने गंभीर विसंगती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे औपचारिक हरकत दाखल केली आहे.
गेल्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सभापती पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या गणनिहाय सदस्य पदांचे आरक्षण प्रसिद्ध झाले. चार गणांपैकी एक जागा नामनिर्देशित महिलांसाठी, एक सर्वसाधारण महिला आणि दोन सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. मात्र, अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी एकही जागा राखीव नसल्यामुळे सभापती पद प्रत्यक्षात रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाविरोधात बौद्ध समाजाचे नेते अनिल कासारे, सरपंच चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्या शीला पवार व सुधाकर येलवे यांनी म्हसळा तहसीलदार यांच्याकडे लेखी हरकत दाखल केली. त्यांनी सभापती पदासाठी निर्धारित आरक्षणानुसार किमान एका गणात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवावी, अशी मागणी केली आहे.
ही हरकत महसूल अव्वल कारकून श्री. धोंडगे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड तसेच म्हसळा तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके