सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। पंढरपूर कॉरिडॉर हा भाविकांसाठी, विकासकामासाठी नसून पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोनातून राबविण्याचे नियोजन शासन व प्रशासन करीत आहे. परंतु या विरोधात संपूर्ण राज्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आवाज उठविणार आहे. प्रसंगी सत्ता बदलासाठी प्रचारदेखील करणार असल्याच्या तीव्र भावना कॉरिडॉर विरोधात आयोजित सभेमध्ये विविध महाराज मंडळींनी व्यक्त केल्या आहेत.
कॉरिडॉरला विरोध केल्याने नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर तसेच डीपीला विरोध करण्यासाठी येथील संभाव्य बाधितांच्या वतीने स्थापित समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज होते. व्यासपीठावर शिरवळकर महाराज, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. महेश महाराज देहुकर, शंकर महाराज गलगलकर, रामकृष्ण महाराज वीर, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, व्यंकटेश गलगलकर, ॲड. आशुतोष बडवे, सुमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड