सोलापूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर-गोवा विमानसेवेस प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीनंतर सर्वच दिवशी तिकीट बुक आहेत. तर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत ९० टक्के तिकिटे बुक झाली आहेत. डिसेंबर महिन्यातील सर्वच दिवस तिकिटे बुक असल्याचे तिकीट बुकिंग एजन्सीकडून सांगण्यात आले.
गोव्याबरोबरच २१ ते २४ ऑक्टोबर या तीन दिवसांची मुंबई-सोलापूर व सोलापूर-मुंबई सेवाही फुल्ल आहे.दिवाळी सुट्टी असल्याने गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. सोलापूरहून गोव्यास जाण्यासाठी २७ ऑक्टोबरनंतर सर्वच दिवशी ९० टक्के फ्लाइट फुल्ल आहेत. नोव्हेंबर महिन्यात ३, ५, ७, ९, २१, २३ व २६ नोव्हेंबर रोजी फ्लाइट फुल्ल आहेत. इतर दिवशीची फ्लाइट ७० ते ९० टक्केपर्यंत बुक आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यातही अशीच स्थिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड