बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या आनंदी वातावरणातच पाटोदा शहर व परिसरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू राहिल्याने व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
बाजारपेठेतील दिवाळीच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अचानक वीज गेली. त्यामुळे दुकानदारांना अंधारात दिवे, सजावट आणि व्यवहार करणे कठीण झाले. काही भागात वारंवार वीज ये-जा होत राहिल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून पुढे येत आहेत.
महावितरणचे अधिकारी मात्र देखभाल आणि तांत्रिक अडचणींचे कारण सांगत आहेत. परंतु दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सततचा वीजलपंडाव सहन न करता नागरिक सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत आहेत.दिवाळी घरात अंधार, दुकानात अंधार मग महावितरणचं कामकाज कुठं? असा प्रश्न पाटोदेकरांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी तातडीने नियमित आणि स्थिर वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis