पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहार प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून पुण्यात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या आरोपानंतर आज मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.
या व्यवहारात माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत सर्व आरोप मोहोळ यांनी फेटाळून लावले. दरम्यान, आता या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत या व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी करत खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेमकं कोणाचं हित साधलं जाणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
पुण्यामध्ये सन १९५८ मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत जैन बोर्डिंगची जागा खरेदी केली. त्या खरेदी खतामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ही जागा ज्या उद्देशाने घेण्यात आली. म्हणजेच शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी त्याच उद्देशासाठी कायमस्वरूपी वापरली जावी. मात्र, आज या जागेची विक्री करून त्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करण्यात येत आहे, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु