मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोला त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) साठी सेबीची मान्यता मिळाली आहे. कंपनीने त्यांच्या अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (यूडीआरएचपी) सेबी कडे सादर केले असून, आयपीओमधून ६,५०० ते ७,०३६ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
मीशो नवीन शेअर्स जारी करून अंदाजे ४,२२१ कोटी रुपये उभारेल, तर अतिरिक्त २,६३८ कोटी रुपये ऑफएस (ऑफर फॉर सेल) द्वारे विकले जातील. या एकूण ७,०३६ रुपये कोटींच्या निधीचा वापर मीशो तंत्रज्ञान सुधारणा, ब्रँड बिल्डिंग आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी करेल.
आयपीओ प्रक्रियेची बुकबिल्डिंग ३० ते ४५ दिवसांपर्यंत चालेल, त्यानंतर शेअर्स लॉन्च केले जातील आणि कंपनीचे अंतिम मूल्यांकन ठरेल. अंदाजानुसार, मीशोचे मूल्यांकन सुमारे ७०,३६० कोटी रुपये (सुमारे ८ अब्ज डॉलर) होण्याची अपेक्षा आहे.
ऑफएस अंतर्गत, दीर्घकालीन गुंतवणूकदार जसे की पीक एक्सव्ही पार्टनर्स, एलिव्हेशन कॅपिटल, व्हेंचर हायवे (सध्याचा जनरल कॅटॅलिस्टचा भाग), वाय कॉम्बिनेटर आणि संस्थापक विदित आत्रे व संजीव बर्नवाल यांचे शेअर्स विकले जातील.
आर्थिक वर्ष २४ मध्ये मीशोचा महसूल ७,६१५ रु. कोटी होता, पण तोटा ३०५ कोटी रुपये राहिला. अमेरिकेतील डेलावेअर येथून भारतात स्थलांतर करताना आलेल्या अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक वर्ष २५ मध्ये तोटा रु. ३,९४१ कोटीपर्यंत वाढला. जर या अतिरिक्त खर्चाचा विचार केला नसता, तर तोटा फक्त १०८ कोटी रुपये राहिला असता. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला रु. २८९ कोटींचा तोटा झाला आहे. मीशो सध्या नफ्याऐवजी वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि पुढील तिमाहीतही हा धोरण अवलंबणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule