पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू होत आहे. आता प्रवाशांना वन पुणे कार्डच्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास करू शकणार आहेत. या सुविधेची अंमलबजावणी पीएमआरडीए, महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.या कार्डद्वारे पुणे मेट्रो, पीएमपीएमएल बससेवा, तसेच भविष्यातील इतर वाहतूक सेवांचा वापर करता येणार आहे. ही एक स्मार्ट कार्ड प्रणाली असून तिचा उपयोग शहरातील विविध सेवांसाठी करता येणार आहे.
सुरुवातीला ही सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या मेट्रो मार्गांवर लागू होईल. ‘वन पुणे कार्ड’ हे स्मार्ट कार्ड असून, यात मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट म्हणजेच अनेक वाहतूक व्यवस्थांमध्ये एकाच कार्डचा वापर करून प्रवास करण्याची सुविधा आहे. या कार्डद्वारे प्रवासी मेट्रोचे तिकीट काढू शकतील, पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करू शकतील आणि भविष्यात पार्किंग, सार्वजनिक सायकल सेवा, सार्वजनिक शौचालये, अगदी किरकोळ खरेदीसाठीही कार्डचा वापर शक्य होईल. हा उपक्रम स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग असून, प्रवाशांना एकसंध आणि सुलभ सेवा देणे हाच उद्देश आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या सेवा वापरताना वेगवेगळी तिकिटे किंवा कार्ड वापरण्याची गरज भासणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु