ओप्पोची Find X9 मालिका लवकरच भारतात होणार लॉंच
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या जगात ओप्पो पुन्हा एकदा नवा मानदंड निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. कंपनीनं अलीकडेच आपली फ्लॅगशिप Find X9 मालिका — Find X9 आणि Find X9 Pro — १६ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लॉंच केली असून, आता या
Oppo Find X9 series


नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या जगात ओप्पो पुन्हा एकदा नवा मानदंड निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. कंपनीनं अलीकडेच आपली फ्लॅगशिप Find X9 मालिका — Find X9 आणि Find X9 Pro — १६ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लॉंच केली असून, आता या मालिकेचा जागतिक प्रवास सुरू झाला आहे. २८ ऑक्टोबरला होणाऱ्या जागतिक लॉंचनंतर ही मालिका भारतातही दाखल होणार असल्याची अधिकृत पुष्टी ओप्पोकडून करण्यात आली आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ मध्ये कंपनीनं जाहीर केलं की Find X9 मालिका नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारात दाखल होईल. नेमकी तारीख अद्याप जाहीर न झाल्याने तंत्रज्ञानप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या मालिकेतील प्रमुख मॉडेल ओप्पो Find X9 Pro मध्ये 6.78 इंचांचा वक्र डिस्प्ले दिला असून त्याच्या चारही बाजूंना केवळ 1.15 मिमी इतके सममितीय बेझल्स आहेत. हा फोन MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित असून उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. ओप्पोने पुष्टी केली आहे की या डिव्हाइसमध्ये Hasselblad Master Camera System दिला आहे, जो LUMO Image Engine तंत्रज्ञानाने समर्थित आहे. या अत्याधुनिक कॅमेरा सिस्टीममुळे छायाचित्रणाचा दर्जा एका नव्या उंचीवर जाणार आहे. विशेष म्हणजे, या फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा Hasselblad टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, जो झूम शॉट्समध्ये विलक्षण स्पष्टता आणि तपशील दाखवतो. चीनमधील आवृत्तीत 50MP वाइड-एंगल, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 200MP टेलिफोटो या तिहेरी कॅमेरा सेटअपचा समावेश आहे, तर समोरच्या भागात 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या क्षेत्रातही ओप्पोने या मॉडेलला नवे आयाम दिले आहेत. Find X9 Pro Dolby Vision मध्ये 4K 120fps रेकॉर्डिंगसाठी सक्षम आहे. यासह ACES सपोर्टसह LOG रेकॉर्डिंग सुविधा देण्यात आली आहे, जी व्यावसायिक व्हिडिओग्राफर्ससाठी मोठी सोय ठरणार आहे. बॅटरीच्या बाबतीत या फोनमध्ये 7,500mAh क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार दोन दिवसांचा बॅकअप देऊ शकते. हा स्मार्टफोन Android 16 आधारित ColorOS 16 वर चालणार असून Silk White आणि Titanium Charcoal या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.

दुसऱ्या मॉडेलबद्दल बोलायचं झालं तर ओप्पो Find X9 हा त्याच्या प्रो व्हर्जनपेक्षा थोडा कॉम्पॅक्ट आहे. यात 6.59 इंचांचा डिस्प्ले असून त्याचाही डिझाइन अगदी नाजूक बेझल्ससह सादर करण्यात आला आहे. यातही Dimensity 9500 चिपसेट, Hasselblad Master Camera System आणि LUMO Image Engine या अत्याधुनिक फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. व्हिडिओग्राफीसाठी हा फोनही 4K 120fps Dolby Vision रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. चीनमधील आवृत्तीत 50MP वाइड-एंगल, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 50MP टेलिफोटो कॅमेरे दिले आहेत, तर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. भारतात उपलब्ध होणाऱ्या आवृत्तीबाबत कंपनीने अजून माहिती जाहीर केलेली नाही.

या मॉडेलमध्ये 7,025mAh क्षमतेची बॅटरी असून हा फोन देखील ColorOS 16 वर कार्यरत असेल. Titanium Grey आणि Space Black या दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध होईल. कंपनीने सांगितले आहे की या दोन्ही स्मार्टफोन्सबद्दल अधिक माहिती येत्या काही आठवड्यांत उघड केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande