पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
रिंगरोडची आता नवीन ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी आठ हजारांहून अधिक झाडांचे पुनर्रोपण, पाच लाखांहून अधिक नवीन वृक्ष लागवड, टोल नाका, टनेल आणि रस्त्यावरील दिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर, अशा विविध माध्यमांतून ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून उदयास येणार आहे . पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. पूर्व व पश्चिम दोन टप्प्यांत असलेल्या या रिंगरोडची एकूण लांबी 136 किलोमीटर असून, त्यांची रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. या रिंगरोडसाठीचे भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात झाली आहे. 2028 पर्यंत रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने ठेवले आहे.हा रिंगरोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखला जावा, यासाठी विविध उपयोजना करण्यासाठी महामंडळाकडून निविदा मागवून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु