मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही टाटा नेक्सॉनच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये लेव्हल-२ अॅडास (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) फीचर्ससह नवीन अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे.
या नव्या अॅडास वैशिष्ट्यांमध्ये पुढे टक्कर इशारा, स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, लेन डिपार्चर इशारा, लेन-कीप असिस्ट, हाय-बीम असिस्ट आणि ट्रॅफिक साइन रेकग्निशन यांचा समावेश आहे. हे फीचर्स फक्त टॉप-स्पेक नेक्सॉन फियरलेस +PS व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील, जे टर्बो-पेट्रोल इंजिन आणि ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. अॅडास वैशिष्ट्यांसह कारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा २७,००० ने जास्त असून, नवीन नेक्सॉन फिअरलेस+PS ची किंमत १३.५३ लाख आहे.
याचबरोबर, टाटाने अॅडास फीचर्ससह नवीन नेक्सॉन रेड डार्क एडिशनही सादर केले आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १३.८१ लाख आहे, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा २८,००० ने जास्त आहे. रेड डार्क एडिशनमध्ये बाह्यदिशेने अॅटलस ब्लॅक फिनिश, गडद अलॉय व्हील्स, रेड डार्क बॅजिंग, स्प्लिट हेडलॅम्प्स आणि एलईडी टेललाइट्ससह स्पोर्टी बंपर दिला आहे. यामध्ये सहा नवीन रंग पर्याय सादर करण्यात आले आहेत, ज्यात फियरलेस पर्पल, क्रिएटिव्ह ओशन, प्युअर ग्रे, फ्लेम रेड, डेटोना ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट यांचा समावेश आहे.
इंटीरियर डिझाइनमध्ये रेड डार्क थीम आणखी आकर्षक बनवण्यासाठी पूर्णपणे काळा डॅशबोर्ड, लाल फिनिश असलेले सीट्स आणि १०.२५-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये जुळणारे ग्राफिक्स दिले आहेत. २०२५ टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत ७.३२ लाख पासून सुरू होते आणि १४.१५ लाखांपर्यंत जाते. जीएसटी २.० नंतर, नेक्सॉनची किंमत १.५५ लाखांनी स्वस्त झाली असून, ही कार किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू, मारुती ब्रेझा, महिंद्रा XUV७०० आणि निसान मॅग्नाइटसह स्पर्धा करेल.
टाटा मोटर्सच्या या नव्या अॅडास अपडेट आणि रेड डार्क एडिशनसह नेक्सॉन आता अधिक सुरक्षित, स्टायलिश आणि आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसमोर उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule