बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकर्यांना गेवराईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, रेशीम शेती करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे आणि इतर शेतकर्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी यासाठी गेवराई मध्ये रेशीम पार्क उभा रहावे, यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी शासनाकडे मागणी केली होती. आ विजयसिंह पंडित यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गेवराई येथे भेट देवुन रेशीम पार्कसाठी आवश्यक जागा व इतर सुविधांची पहाणी केली. या अनुषंगाने संबंधित अधिकार्यांची त्यांच्या उपस्थितीत गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीत श्री. अमरसिंह पंडित यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला आ विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट, तहसिलदार संदिप खोमणे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, उपविभागीय अभियंता ऋषिकेश चिरके, सभापती जगन्नाथ काळे, सचिव शिवाजी हकदार यांच्यासह महसुल, कृषी व रेशीम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रेशीम पार्क निर्मिती साठी आवश्यक प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. रेशीम पार्क मुळे गेवराई तालुक्यातील रेशीम शेतीला मोठी चालना मिळणार असल्याचे आ विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis