परभणी, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान, सेलू तर्फे जिल्हास्तरीय पहिल्या अक्षर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सेलू येथील नुतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात डॉ. एस. एम. लोया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. संमेलनाचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सेलू येथे होणार असून, या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारीणी आणि विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्याध्यक्षपदी रामराव निकम, स्वागताध्यक्षपदी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, सरचिटणीसपदी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, करूणा बागले, मुख्याध्यापक निशा पाटील, कोषाध्यक्ष डॉ. सतीश मगर व एकनाथ जाधव, सचिव डॉ. सुरेश हिवाळे आणि डॉ. शरद ठाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयक म्हणून डॉ. काशिनाथ पल्लेवाड आणि अजित मंडलिक कार्यभार पाहणार आहेत.
ललिता गिल्डा, विजया कोठेकर, कांचन बाहेती, संतोष कुलकर्णी, डॉ. राजाराम झोडगे, भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, प्रा. संजय पिंपळगावकर, डॉ. मोहन काटकर, बाळू बुधवंत, रवीकिरण गंभिरे, डॉ. जयश्री सोन्नेकर आदी साहित्यप्रेमी संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे हे सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील भूमिपुत्र असून, ‘इडा पिडा टळो’, ‘अलोक’, ‘वाळसरा’ (कथासंग्रह), ‘धूळपेर’ (ललित लेखन) आणि ‘तसनस’ (कादंबरी) अशी त्यांची उल्लेखनीय साहित्यकृती प्रकाशित आहेत.
राज्य वाङ्मय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार हा मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) सायं. ५ वाजता महिला मंडळ आयोजित ‘संतवाणी’ कार्यक्रम होणार आहे.
तर रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल.
संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांची मेजवाणी असणार असून, त्यात परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकथन, बालकट्टा, परभणीचे अंतरंग कवी कट्टा आणि गझल मुशायरा यांचा समावेश आहे.
संमेलनास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर (लासलगाव), डॉ. मार्तंड कुलकर्णी (किनवट), प्रा. श्रीधर नांदेडकर (छत्रपती संभाजीनगर), डॉ. राजेश गायकवाड (परभणी) तसेच नीलम शिर्के, नामदेव कोळी, एकनाथ आव्हाड (मुंबई), विलास सिंदगीकर (लातूर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis