साेलापूर जिल्ह्यात घरकुलांच्या बांधकामाला सुरवात
सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२५-२६ वर्षासाठी जिल्ह्यातील एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ८७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. आतापर्यंत लाभार्थींना प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ताही वितरित
साेलापूर जिल्ह्यात घरकुलांच्या बांधकामाला सुरवात


सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२५-२६ वर्षासाठी जिल्ह्यातील एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ८७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. आतापर्यंत लाभार्थींना प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ताही वितरित झाला आहे. मात्र, अजूनही १६ हजार लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही बांधकामाला सुरवात केलेली नाही.

त्या लाभार्थींचा शोध घेऊन आता त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.बांधकाम साहित्य (स्टील, सिमेंट, विटा, मजुरी) महागले आहे. त्यामुळे शासनाकडून घरकुलासाठी मिळणाऱ्या एक लाख २० हजार रुपयांत घरकूल बांधून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १६ हजार बेघर लाभार्थींनी बांधकाम सुरू करण्यापूर्वी सावध भूमिका घेतली आहे. त्यांची बांधकामाची तयारी आहे, पण तीन लाखांचा खर्च करण्यास अडचणी असल्याने त्यांनी बांधकामे सुरू केलेली नाहीत.

राज्य सरकारने घरकूल लाभार्थींना वाढीव ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा एप्रिल २०२५ मध्ये निर्णय घेतला. मात्र, अजूनही वाढीव अनुदान मिळू शकलेले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीमुळेदेखील अनेक लाभार्थींना कामे सुरू करता आलेली नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande