आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पारंपरिक रीतिरिवाजाने सीमोल्लंघन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पारंपरिक रीतिरिवाजाने संपन्न होणारा सीमोल्लंघन सोहळा यावर्षीही अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. देवीजींची मूर्ती आज पहाटेच्या ब्रा
Q


छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पारंपरिक रीतिरिवाजाने संपन्न होणारा सीमोल्लंघन सोहळा यावर्षीही अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला.

देवीजींची मूर्ती आज पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर विधीवत पूजा व आरती करुन गाभाऱ्यातून बाहेर काढण्यात आली. देवीजींचे माहेर असलेल्या अहिल्यानगर येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीत पारंपरिक संबळ, ढोल ताशांच्या गजरात व आई राजा उदे उदेच्या घोषात मंदिर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मंदिर परिसरात पिंपळाच्या पारावर देवीजींची पालखी विसावली. प्रथेप्रमाणे मानाच्या पूजाऱ्यांकडून पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. त्यानंतर देवीजींची मूर्ती गाभाऱ्यात मांडण्यात आलेल्या पलंगावर नेण्यात आली. त्यानंतर देवीची मंचकी निद्रा अर्थात 'श्रमनिद्रा' सुरू झाली.

या सोहळ्याच्या अखेरीस अहिल्यानगर येथून आलेल्या भक्तांनी मानाची पालखी परंपरेनुसार तोडून तिचे होमात विसर्जन केले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर देवीच्या जयघोषाने, पारंपरिक वाद्यांच्या निनादाने आणि भक्तांच्या जल्लोषाने दुमदुमून गेला होता.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande