अभिजात भाषांचा गौरव : मराठी-पाली भाषेचा शाश्वत सांस्कृतिक वारसा
भारत हा भाषिक वैविध्याचा खरा खजिना मानला जातो. या भूमीवर शेकडो भाषांचा उदय झाला, काही भाषा काळाच्या ओघात नाहीशा झाल्या, तर काहींनी साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि समाजकारणाला अमर योगदान दिले. भाषेच्या माध्यमातून समाज आपली परंपरा, मूल्ये आणि संस्कृत
अभिजात भाषा


भारत हा भाषिक वैविध्याचा खरा खजिना मानला जातो. या भूमीवर शेकडो भाषांचा उदय झाला, काही भाषा काळाच्या ओघात नाहीशा झाल्या, तर काहींनी साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि समाजकारणाला अमर योगदान दिले. भाषेच्या माध्यमातून समाज आपली परंपरा, मूल्ये आणि संस्कृती पुढील पिढीकडे पोहोचवतो. त्यामुळे भाषेचे महत्त्व केवळ संवादापुरते मर्यादित राहत नाही, तर ती समाजाची आत्मा ठरते. भारतीय उपखंड हा भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचा खजिना आहे. येथे जन्मलेल्या असंख्य भाषांनी जगाच्या बौद्धिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला घडवले आहे. या पैकी काही भाषा केवळ संवादाची साधने न राहता मानवी विचार, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळेच भारत सरकारने काही भाषांना “अभिजात भाषा” असा मानद दर्जा बहाल केला आहे. अशा अनेक भाषांमध्ये मराठी व पाली या दोन्ही भाषांनी विशेष स्थान प्राप्त केले आहे. म्हणूनच भारत सरकारने त्यांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आणि दि. ३ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी व पाली भाषा दिन’ साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली. हा दिवस म्हणजे भारतीय भाषिक वारशाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करण्याचा क्षण आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी साजरा होणारा “अभिजात मराठी व पाली भाषा दिन” म्हणजे या दोन भाषांच्या ऐतिहासिक वारशाचा, शाश्वत सांस्कृतिक परंपरेचा आणि संविधानाने दिलेल्या भाषिक सन्मानाचा गौरव करण्याचा क्षण आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही केवळ भाषिक मान्यता नाही, तर त्यामागे ठोस निकष आहेत. त्यामध्ये अभिजात भाषेचा इतिहास किमान दीड-दोन हजार वर्षांचा असावा, तिचे प्राचीन वाङ्ममय विपुल प्रमाणात उपलब्ध असावे, त्या भाषेच्या साहाय्याने साहित्य, तत्त्वज्ञान व संस्कृतीचा विकास घडलेला असावा आणि ती भाषा आधुनिक भाषांवर प्रभाव टाकणारी असावी. ती तिच्या मूळ रूपात जतन झालेली असावी व आधुनिक भाषांवर तिचा प्रभाव असावा.

या सर्व अटींना मराठी व पाली दोन्ही भाषांनी पूर्ण न्याय दिला आहे. मराठीने अपार लोकवाङ्मय निर्माण केले, तर पालीने बौद्ध तत्त्वज्ञानाचा जागतिक वारसा जतन केला. त्यामुळे त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही योग्यता आणि अभिमानाची बाब आहे.

मराठी व पाली या दोन्ही भाषांचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि विचारांचे मूळ आहे, तर पाली ही बुद्धधर्मीय तत्त्वज्ञानाची आणि मानवतेच्या सार्वत्रिक संदेशाची शाश्वत वाहक आहे. या दोन्ही भाषांनी केवळ साहित्यिक अभिव्यक्तीलाच नव्हे तर सामाजिक चळवळींनाही दिशा दिली आहे. म्हणूनच या दोन्ही भाषांचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या वारशाचा ठसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये एकवीसाव्या शतकापर्यंत २२ भाषा समाविष्ट झालेल्या आहेत. या सर्व भाषांना राष्ट्रभाषिक मान्यता मिळाली आहे. मराठी ही या अनुसूचीत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची भाषा असून तिला २०१३ मध्ये भारत सरकारने अभिजात भाषा दर्जासाठी मान्यता दिली होती, मात्र औपचारिक घोषणा व अंतिम मान्यता ३ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आली. पाली भाषेलाही याच दिवशी अभिजात दर्जा बहाल झाला. या निर्णयामुळे मराठी व पाली या दोन्ही भाषांना जागतिक पातळीवर नवा सन्मान प्राप्त झाला.

मराठी आणि पाली भाषेचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे. मराठी भाषा ही अपभ्रंश, महाराष्ट्रीय प्राकृत यापासून विकसित होत आजची आधुनिक मराठी घडली. शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते आणि पुरातत्त्वीय साधनांमधून मराठीचा पुरातन वारसा स्पष्ट दिसतो. ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे मराठीला ज्ञानप्रकाशाचे वाङ्मय दिले. एकनाथांनी आपल्या भावस्पर्शी ओव्यांमधून समाजमनाला मानवतेचा संदेश दिला. संत तुकारामांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती आणि समतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यकारभाराची भाषा म्हणून प्रस्थापित करून तिला सामर्थ्य दिले. पुढे महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी मराठी लेखनातून समाजाला जागवले. आधुनिक काळात अण्णा भाऊ साठे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, बाबुराव बागूल आदी साहित्यिकांनी मराठीला नवीन रूप दिले. नाटक, कथा, कादंबरी, कविता, विज्ञानलेखन, पत्रकारिता, चित्रपट अशा सर्व क्षेत्रांत मराठी भाषेची अभिव्यक्ती आजही तेजस्वी आहे. मराठी भाषेतील साहित्य, लोकगीते, नाट्यप्रकार, लोककला व अभिव्यक्तीच्या विविध रूपांनी ती अभिजात ठरते.

पाली भाषेचा इतिहास अधिक प्राचीन, बुद्धकालीन आहे. गौतम बुद्धांनी जनभाषेत संवाद साधण्यासाठी पाली या लोकभाषेतून संवाद साधला, त्यांची वचने पाली भाषेत नोंदली गेली. त्यांच्या उपदेशांची नोंद पाली भाषेत झाली आणि पुढे ती त्रिपिटक या महान ग्रंथसंपदेत संकलित झाली. त्यामुळे पाली ही बौद्ध साहित्याची मुख्य भाषा ठरली. त्रिपिटक, सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक ही पालीतील धर्मग्रंथसंपदा आजही जगभरातील संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरते. हे पाली भाषेतील अमूल्य धर्मग्रंथ आजही जगभर अभ्यासले जातात. पाली भाषेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचे ज्ञान श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आदी देशांमध्ये पसरले. करुणा, मैत्री, अहिंसा आणि मध्यममार्गाचा संदेश पाली भाषेतून जगभर पोहोचला. या भाषेने मानवतेच्या सार्वत्रिक मूल्यांना आकार दिला. बौद्ध धर्माच्या जागतिक प्रसारामध्ये पाली भाषेचे योगदान अद्वितीय आहे. त्यामुळे पाली ही केवळ भाषा नाही, तर जागतिक मानवतावादाची वाहक ठरते.

संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट २२ भाषांना राष्ट्रभाषिक मान्यता आहे. अनुच्छेद ३४४ व ३५१ मध्ये भाषिक धोरणाची रूपरेषा दिली आहे. अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषांना केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक सहाय्य, संशोधन निधी आणि अभ्यासासाठी स्वतंत्र केंद्रे स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मराठी व पाली या भाषांवर आधारित संशोधनाला चालना मिळेल, प्राचीन ग्रंथांचे भाषांतर होईल, डिजिटल स्वरूपातील ग्रंथालये उभारली जातील आणि नव्या पिढ्यांना या भाषांचा परिचय मिळेल. हा निर्णय म्हणजे भाषिक वारशाच्या संरक्षणाकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. शालेय व उच्च शिक्षणात मराठीचे बंधनकारक अध्ययन, विद्यापीठांमध्ये मराठी विभागांची मजबुती, मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमांतून विज्ञानविषयक ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणे हे प्रयत्न लक्षणीय आहेत. दुसरीकडे पाली भाषेच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नालंदा, वाराणसी यासारख्या विद्यापीठ केंद्रांवर पाली भाषेचे विभाग व संशोधन केंद्र कार्यरत असून या ठिकाणी पाली भाषा अभ्यासकांचे संशोधन चालते. बौद्ध संस्कृती व पाली साहित्य या विषयांवर आजही आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध अध्ययन परिषदांमध्ये पाली अभ्यासाला प्रोत्साहन मिळते. पाली व मराठी या दोन्ही भाषांच्या संशोधनामुळे भारतीय परंपरा व जागतिक मानवतावादाला दिशा मिळते.

मराठी व पाली भाषांचा संगम म्हणजे भारताच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. मराठीने लोकमानसाशी संवाद साधला, तर पालीने विश्वमानवतेला दिशा दिली. दोन्ही भाषांनी समानतेचा व मानवतेचा संदेश दिला. मराठीतील संतवाङ्ममय व पालीतील बौद्ध वाङ्मय एकाच धाग्याने जोडले गेलेले दिसते तो धागा म्हणजे मानवकल्याण होय.

आजच्या युगात जागतिकीकरणामुळे इंग्रजीसारख्या भाषांचे वर्चस्व वाढले आहे. पण आपल्या भाषांचा वारसा जोपासणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. भाषाच संस्कृतीचे मूळ आहे. मराठी व पाली भाषांनी मानवतेला दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मराठीने सामाजिक ऐक्य, लोकशाही मूल्ये व सांस्कृतिक विविधतेला अधोरेखित केले, तर पालीने अहिंसा, करुणा व समानतेचा मार्ग दाखवला. दोन्ही भाषांचा संगम म्हणजे भारताच्या वैभवशाली संस्कृतीचा दीपस्तंभ आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा त्या दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मराठी व पालीला मिळालेली मान्यता ही केवळ महाराष्ट्र वा बौद्ध समाजाची नाही, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीची उपलब्धी आहे. या निमित्ताने युवकांना आपल्या भाषांचा अभिमान वाटावा, त्यांचा अभ्यास करावा व जागतिक पातळीवर या भाषांचा ठसा उमटवावा ही अपेक्षा आहे.

दि. ३ ऑक्टोबर रोजी साजरा होणारा अभिजात मराठी व पाली भाषा दिन म्हणजे केवळ औपचारिक उत्सव नसून भाषिक जागरूकतेचे, संशोधनाच्या प्रेरणेचे व सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. या दिवशी विविध ठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे, स्पर्धा, नाट्यप्रयोग, ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जावीत. या सर्व उपक्रमांचा उद्देश हा की समाजातील प्रत्येक घटकाला मराठी व पाली या भाषांचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व समजावे हा आहे.

भारताच्या भाषिक वारशाला जागतिक पटलावर स्थान मिळवून देण्यासाठी संविधानाने घालून दिलेल्या तरतुदींचा आधार घेऊन आपण या वारशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. लोकशाही समाजात भाषिक विविधता हीच खरी ताकद असते. अभिजात भाषांचा गौरव करताना आपण सर्व भाषांचा सन्मान करणे आवश्यक आहे.

आज जेव्हा आपण अभिजात मराठी व पाली भाषा दिन साजरा करतो, तेव्हा तो फक्त इतिहास स्मरणाचा दिवस नाही, तर भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा क्षण आहे. भाषांचा वारसा जपणे, तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून नवीन सर्जनशीलतेला चालना देणे हीच खरी अभिव्यक्ती आहे. भाषांचा गौरव करूनच आपण खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपू शकतो. अभिजात मराठी व पाली भाषा दिन म्हणजे भाषेचा, संस्कृतीचा आणि मानवतेच्या एकात्मतेचा उत्सव आहे. या दोन भाषांच्या शाश्वत वारशातूनच भारतीय लोकशाहीचे आणि सांस्कृतिक वैविध्याचे खरे सौंदर्य प्रकट होते. मराठी व पाली भाषांचा हा अभिजात प्रवास भारताच्या भाषिक वैविध्याचा व सांस्कृतिक वैभवाचा दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही.

- डॉ. राजेंद्र बगाटे

(लेखक, समाजशास्त्र, मराठी व पाली भाषेचे अभ्यासक)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande