ढाका, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी आरोप केला आहे की, मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने देशात कट्टरतावादाला चालना दिली, ज्यामुळे धार्मिक अत्याचार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी सांगितले की, या वर्षी हिंदू अल्पसंख्याक समुदाय दुर्गापूजा भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात साजरी करत आहे. सजीब वाजेद हे यापूर्वी पंतप्रधानांचे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविषयक सल्लागार राहिले आहेत.
सजीब वाजेद म्हणाले, “दुर्गापूजा ही भक्ती आणि उत्सवाचा काळ असतो. हा सण म्हणजे चांगुलपणाचा वाईटावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. पण यंदा, आपले हिंदू बांधव बांगलादेशात ही पूजा भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत साजरी करत आहेत. युनुस सरकारच्या काळात वाढलेल्या कट्टरपंथामुळे धार्मिक अत्याचारांचे जुने सावट परत आले आहे.”
सजीब वाजेद यांनी हेही उघड केले की या काळात मंदिरांवर हल्ले झाले, कुटुंबांना धमकावण्यात आले, आणि स्वतंत्रपणे पूजा करण्याचा अधिकार पुन्हा एकदा धोक्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, “तेच कट्टरपंथी, ज्यांनी 1971 साली बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता, ते आता अधिक धाडसी झाले आहेत आणि 1971 च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये दहशत पसरवत आहेत.”
वाजेद म्हणाले की, आवामी लीग ही नेहमीच बांगलादेशातील अल्पसंख्यकांच्या संरक्षणासाठी उभी राहणारी पक्ष आहे.
या पक्षाने 1971 मध्ये नष्ट झालेली मंदिरे पुन्हा बांधली, हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजाला त्यांच्या श्रद्धेनुसार पूजा-अर्चा करण्याचा अधिकार बहाल केला आणि सांप्रदायिक हिंसा रोखण्यासाठी कठोर उपाय लागू केले.
ते पुढे म्हणाले, “धर्मनिरपेक्षता आणि समता हे आमच्या राजकारणाचे मूलभूत तत्त्व आहेत, कारण बांगलादेश एकतेच्या दृष्टिकोनातून जन्माला आला होता, विभाजनातून नव्हे. आज जेव्हा आपले हिंदू बांधव आई दुर्गेची पूजा करतात, दीप प्रज्वलित करतात, तेव्हा आपण त्यांच्या भोवतालच्या भीतीच्या वातावरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण आपल्याला हेही माहीत आहे की हा अंधार कायमचा नाही.”
सजीब वाजेद यांनी आश्वासन दिले की, आवामी लीग पुन्हा सत्तेवर येईल आणि प्रत्येक हिंदू, प्रत्येक अल्पसंख्याक आपल्या धर्माचे पालन पूर्ण स्वातंत्र्य आणि सन्मानाने, कोणत्याही भीतीशिवाय करू शकेल, आणि बांगलादेशात सन्मानाने आणि सुरक्षिततेने जीवन जगू शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode