कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्याला मंगलतोरण; ‘शौर्यगाथा'चे सादरीकरण
कोल्हापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि २ ऑक्टोबर १८३४ रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा सोहळा ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झा
भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण


कोल्हापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि २ ऑक्टोबर १८३४ रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा सोहळा ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झाला. विशेष म्हणजे, यंदा २ ऑक्टोबर हा विजयादशमीचा सण होता. भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बांधण्यात आले. हीलरायडर्स एडवेंचर फाउंडेशनतर्फे गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. “हा उपक्रम कोल्हापूरचा अभिमान आहे,” असे शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी नमूद केले.


‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी गीते, नृत्ये आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत सजलेल्या कलाकारांनी महाराष्ट्रीय गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी नगारखाना इमारतीच्या समृद्ध इतिहासाची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. कोल्हापुरातील युवा सॅक्सोफोन वादक अरहान मिठारी याने ‘आम्ही आंबेचे गोंधळी’, ‘लल्लाटी भंडार’ आणि ‘आईचा गोंधळ’ या गीतांना सॅक्सोफोनच्या मधुर स्वरांनी सजवले. त्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.


कार्यक्रमाला शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विजय दवणे, आदिल फरास, सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, उदय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हीलरायडर्सतर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही यावेळी करण्यात आला.


१८२८ ते १८३३ या कालावधीत पाच लाख रुपये खर्चून बांधलेली पाच मजली नगारखाना इमारत ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसाची साक्ष आहे. स्थानिक कारागिरांनी बेसाल्ट दगडाचा वापर करून तयार केलेल्या आयने महालातील चकाकणाऱ्या भिंती आणि खांब आजही या इमारतीचे वैशिष्ट्य आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक घड्याळ, नगारे वाजवण्याचे ठिकाण, भगवा ध्वज, गॅलरी, पायऱ्या आणि खिडक्या यांसारख्या कलाकृतींची बारकाईने पाहणी केली. या सर्व वैशिष्ट्यांनी नगारखान्याचा ऐतिहासिक वारसा आजही जिवंत असल्याचे दिसून आले.


‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ कार्यक्रम आणि नगारखान्याच्या १९१ वर्षांचा सोहळा यामुळे कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. हा उपक्रम पुढील पिढ्यांना आपला समृद्ध वारसा समजावून सांगण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande