परभणी, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे सहकुटुंब व लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून धम्मचक्र अनुप्रवर्तन केले होते. त्याच्या स्मृतीदिनी दरवर्षी देशभरात मोठ्या श्रद्धेने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर परभणी शहरात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि महावंदना सुकाणू समिती यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ८.३० वाजता परभणीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भीमसागर उसळला होता. सुरुवातीला डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धम्मध्वज फडकावून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
यानंतर उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांना पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो आणि पूज्य भदंत पी. धम्मनंदजी यांनी बुद्ध वंदना दिली. त्यांच्या मंगल वचनेने वातावरण करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या संदेशाने भारावून गेले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रमाताई आंबेडकर तेलतुंबडे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे, महासचिव धोंडीराज खेडकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे, राज्य सचिव बाबासाहेब धबाले, तसेच डी. के. टोम्पे, नागसेन हत्तीअँभीरे, एस. एम. कांबळे, बालू शिंदे, एम. एम. बरे, वैराट, सूर्यकांत साळवे, इंजि. गोपीनाथ कांबळे, चंद्रकांत वावळे, अविनाश सावंत, सुनीता साळवे, प्रेमलता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला बौद्ध समाजातील हजारो अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक यांनी संपूर्ण कार्यक्रमाला शिस्तबद्धता आणि भव्यता प्राप्त करून दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता व बौद्ध धम्माचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमात करण्यात आले. वक्त्यांनी आपल्या मनोगतात, धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी भारतीय समाजाला समतेचा नवा मार्ग दिला. आजच्या काळातही त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis