लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मूल्यांचे एक जिवंत आदर्श उदाहरण आहे. त्यांचे कार्य केवळ भारताच्या स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते जगभरातील शांतता, न्याय आणि सामाजिक कार्यासाठी ते कायम प्रेरणास्त्रोत ठरले आहेत . आज समाजात वावरत असताना तरुण पिढीला महात्मा गांधीजींचे कार्य समजले पाहिजे, नव्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराची गरज असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ध्यानस्त पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,रमेश अंबरखाने, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उषा कांबळे, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका अतुलनीय आहे, महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने, म्हणजे सत्याग्रह आणि असहकार चळवळींचा वापर करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय स्वातंत्र्यालाच नव्हे, तर सामाजिक सलोख्यालाही महत्त्व दिले आणि स्वतंत्र भारताला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग दाखवला आहे. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा ध्यानस्थ पुतळा प्रेरक राहणार असल्याचे मत आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले .
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरीक, पक्षाचे कार्यकर्ते, नगर परिषदेचे कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis