महिला ह्या कोणत्याही कुटुंबाचा आणि समाजाचा आधारस्तंभ आहेत. त्या केवळ कुटुंबाची काळजी घेत नाहीत, तर देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. जेव्हा एक महिला निरोगी आणि सक्षम असते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला बळ मिळते आणि त्यातूनच एक सशक्त कुटुंब व सशक्त राष्ट्र उभे राहते. याच विचारातून, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आणि महिला व बाल विकास मंत्रालयाने एकत्रितपणे 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही मोहीम 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे हा आहे.
आरोग्याचा पाया: महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज
आपल्या कुटुंबाची काळजी घेताना महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की पौष्टिक आहाराची कमतरता, अशक्तपणा, जीवनसत्त्वांची कमतरता आणि मानसिक ताण-तणाव. ही समस्या आजही ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांसाठी एक मोठे आव्हान आहे. यावर मात करण्यासाठी 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत देशभरात, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांत, लाखो महिलांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.
या अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि अंगणवाड्यांमध्ये विशेष तपासण्या, लसीकरण आणि आरोग्यविषयक समुपदेशन उपलब्ध आहे. आरोग्य विभागामार्फत कुटुंबातील महिलांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून त्या त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देतील.
प्रमुख आरोग्य तपासण्या आणि उपचार
या अभियानाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांच्या आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन सामाजिक बदल घडवून आणणे. यासाठी उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची मोफत तपासणी केली जात आहे. याशिवाय क्षयरोग, कुष्ठरोग, ॲनिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया यांसारख्या रोगांचीही लवकर ओळख पटवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जात आहेत.
गर्भवती महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, लसीकरण आणि प्रसूतीपूर्व काळजी या सुविधा उपलब्ध आहेत. 'जननी शिशु सुरक्षा योजना' आणि 'जननी सुरक्षा योजना' यांसारख्या योजनांमधून माता-शिशू मृत्यूदर कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. याशिवाय पोषण आणि जनजागृती सत्रांद्वारे संतुलित आहार, स्वच्छता आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.
'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या मोहिमेमुळे महिलांना केवळ मोफत आरोग्य सेवाच मिळत नाही, तर त्या आरोग्य साक्षरही होत आहेत. यामुळे महिलांचे आरोग्य सुधारेल, ज्यामुळे त्यांचे कुटुंब सशक्त होईल आणि राज्याचा एकूण आरोग्य निर्देशांक वाढेल. हा निर्देशांक वाढविण्यासाठी ही मोहीम निश्चितच फायदेशीर ठरेल, यात शंका नाही.
हा उपक्रम केवळ आरोग्य सेवा पुरवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो महिलांना अधिक सक्षम बनवून राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. जेव्हा महिला निरोगी असतील, तेव्हाच एक सक्षम आणि प्रगतशील समाज निर्माण होईल.
मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी ठाणे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर