वॉशिंग्टन, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते पुढील महिनाभरात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीत सोयाबीनचा मुद्दा चर्चेचा एक महत्त्वाचा विषय असेल.
ट्रम्प म्हणाले की, चीनसोबत “चर्चा” सुरू असल्याच्या कारणास्तव अमेरिका सोयाबीन खरेदी करत नाही, त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ट्रम्प यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची प्रतिज्ञा केली आहे.
ट्रुथ सोशल या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी लिहिले, “आपल्या देशातील सोयाबीन शेतकऱ्यांना नुकसान होत आहे कारण चीन केवळ ‘चर्चा’ सुरू असल्याने खरेदी करत नाही. आपण टॅरिफ्समधून इतका पैसा कमावला आहे की त्यातील एक छोटा भाग वापरून आपण आपल्या शेतकऱ्यांना मदत करू. मी कधीही माझ्या शेतकऱ्यांना निराश होऊ देणार नाही!
जो बाइडेन यांच्या कार्यकाळात चीनसोबतचा आमचा करार अमलात आणला गेला नाही, जिथे त्यांनी आपल्या अब्जावधी डॉलरच्या कृषी उत्पादने खरेदी करायची होती, पण त्यांनी विशेषतः सोयाबीन खरेदी केलीच नाही. हे सगळं लवकरच सुरळीत होईल.मला आपल्या देशभक्त नागरिकांवर खूप प्रेम आहे आणि प्रत्येक शेतकरी हा एक देशभक्तच आहे! मी चार आठवड्यांत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेईन आणि सोयाबीन चर्चेचा एक प्रमुख मुद्दा असेल. इतर पिकांबाबतही चर्चा होईल आणि ती देखील उत्तमच असेल!”
याआधी २० सप्टेंबर रोजी ट्रम्प यांनी जाहीर केले होते की चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिका स्थित व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकच्या कराराला मान्यता दिली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते, “राष्ट्रपती शी यांच्यासोबत माझी चांगली चर्चा झाली. त्यांनी टिकटॉक करारास मंजुरी दिली आहे. आम्ही हा करार पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत. त्यावर स्वाक्षरी करणे ही फक्त एक औपचारिकता असेल. टिकटॉक डील आपल्या मार्गावर आहे, आणि गुंतवणूकदार तयार होत आहेत.” ट्रम्प यांनी हे देखील नमूद केले की अमेरिका या अॅपवर “कठोर नियंत्रण” ठेवेल, आणि हा करार वॉशिंग्टनसाठी खूप फायदेशीर ठरेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode