वॉशिंग्टन , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात बुधवारी रात्री एक मोठा विमान अपघात टळला. ला गार्डिया विमानतळावर डेल्टा एअरलाईन्सच्या दोन फ्लाइट्स एकमेकांना धडकल्या. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाइन्सच्या सहाय्यक कंपनी एंडेवर एअरद्वारे चालवली जात होती. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. अपघातानंतर दोन्ही विमानांमधील प्रवाशांना खाली उतरवून बसद्वारे टर्मिनलपर्यंत नेण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, ही धडक स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 9: 58 वाजता झाली, असे त्यांनी सांगितले.
अधिकार्यांच्या मते, एक विमान लँडिंगनंतर गेटकडे जात होते, तेव्हाच स्थानिक वेळेनुसार रात्री 9:58 वाजता दुसरे एक विमान, जे टेकऑफसाठी तयारीत होते, त्याला धडकले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये दिसून येते की एका विमानाचा पंख पूर्णपणे तुटलेला आहे. जखमी प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विमाने बॉम्बार्डियर CRJ-900 मॉडेलची होती.
डेल्टा एअरलाईन्सने दिलेल्या निवेदनानुसार, ही हळू गतीने झालेली धडक एंडेवर एअरच्या दोन फ्लाइट्समध्ये झाली. एक फ्लाइट (5047) नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लेटहून येत होती, आणि दुसरी फ्लाइट (5155) वर्जिनियाच्या रोअनोकसाठी रवाना होणार होती.
एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक माहितीनुसार फ्लाइट 5155 च्या एका पंखाने फ्लाइट 5047 च्या मुख्य शरीराला धडक दिली. एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला घटनास्थळी प्राथमिक उपचार दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. फ्लाइट 5155 मध्ये 28 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह एकूण 32 लोक होते. तर फ्लाइट 5047 मध्ये 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह 61 लोक होते.
सध्या, या धडकेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, या घटनेचा विमानतळाच्या इतर कामकाजावर काहीही परिणाम झाला नाही. दोन्ही विमानांमधील प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवून शटल बसद्वारे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आले. एअरलाइन्सने हेही स्पष्ट केलं की ज्यांना गरज होती, त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गुरुवारी त्यांच्या नवीन फ्लाइट्सची व्यवस्था केली गेली.
डेल्टा एअरलाइन्सने अधिकृत विधान करत म्हणाले “आमची टीम न्यूयॉर्क ला गार्डिया हबवर प्रवाशांची काळजी घेत आहे. एंडेवर एअरने चालवलेल्या दोन विमानांमध्ये झालेल्या या हळू गतीच्या धडकेची चौकशी सुरू असून, आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करू. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा. या गैरसोयीबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची माफी मागतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode