बदलापूर, 20 ऑक्टोबर : गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या वित्तीय सेवा शाखा गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून ‘पक्का पता’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश बदलापूरसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहकर्ज सुविधांद्वारे सामान्य कुटुंबांसाठी घर खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ बनवणे हा आहे.
‘पक्का पता’ मोहीम पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या भावनिक प्रवासावर प्रकाश टाकते. भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात स्थलांतर करण्याच्या प्रवासात गोदरेज हाऊसिंग फायनान्स हा एक विश्वासार्ह सहकारी ठरतो.या उपक्रमामागील मुख्य कल्पना अत्यंत साधी पण खोल अर्थ घेऊन येते – ‘पक्का पता’, म्हणजेच स्वतःच्या नावाने असलेला कायमस्वरूपी पत्ता. भारतातील असंख्य कुटुंबांसाठी हे केवळ एक पत्ता नसून, स्वप्नपूर्ती, स्थैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
गोदरेज कॅपिटलचे मुख्य विपणन अधिकारी नलिन जैन यांनी सांगितले की, घर खरेदी ही आर्थिक निर्णयापलीकडची गोष्ट आहे – ती एक भावनिक वाटचाल आहे. 'पक्का पता' हा तो क्षण असतो जेव्हा तुमचे स्वप्न वास्तवात उतरते. भाड्याने राहिलेली जागा जेव्हा तुमची स्वतःची होते, तेव्हा अभिमान, स्थैर्य आणि सुरक्षिततेची अनुभूती मिळते. आमची सुलभ कर्ज प्रक्रिया, घराच्या 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य आणि लवचिक परतफेड योजना यांमुळे आम्ही भारतातील वाढत्या बाजारपेठांतील कुटुंबांसाठी घरमालकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देत आहोत. ही मोहीम बदलापूर, विरार, पनवेल, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव आदी महाराष्ट्रातील टियर-2 शहरांमध्ये राबवली जात आहे. याशिवाय, गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, वापी, गांधीधाम, हिंमतनगर, सुरेंद्रनगर, अंकलेश्वर आणि इतर शहरी भागांमध्येही या मोहिमेचा विस्तार केला जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु