व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगच्या जागी एक नवीन भव्य बॉलरूम उभारलं जाणार- ट्रम्प
वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की, व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगला पाडून तिथे एक नवं, भव्य “प्रेसिडेन्शियल बॉलरूम” उभारलं जाणार आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की, हा प्रकल्प पूर्णतः खाजगी निधीतून उभा
ट्रम्प


वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की, व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगला पाडून तिथे एक नवं, भव्य “प्रेसिडेन्शियल बॉलरूम” उभारलं जाणार आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की, हा प्रकल्प पूर्णतः खाजगी निधीतून उभारला जाणार असून अमेरिकन करदात्यांवर याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली. त्यांनी सांगितले की, हा बॉलरूम राजकीय भेटीगाठी, मोठे समारंभ आणि अधिकृत कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

ट्रम्प म्हणाले की, “गेल्या 150 वर्षांपासून प्रत्येक राष्ट्रपतीचे हे स्वप्न राहिले आहे की व्हाईट हाऊसमध्ये एक भव्य बॉलरूम असावा. मला अभिमान आहे की मी हा बहुप्रतीक्षित प्रकल्प सुरू करणारा पहिला राष्ट्रपती ठरलो.”

सदर बॉलरूमचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 90,000 चौरस फूट असेल आणि त्याची अंदाजे किंमत 200 दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ₹1,660 कोटी रुपये) एवढी असेल. हा प्रकल्प ट्रम्प यांच्या दीर्घकाळच्या इच्छेचा भाग आहे. व्हाईट हाऊसमध्ये एक आधुनिक आणि भव्य इव्हेंट स्पेस तयार करण्याचा, जो त्यांच्या खासगी क्लबप्रमाणे देखणं आणि आलिशान दिसेल.

व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या चित्रांनुसार, या बॉलरूममध्ये क्रिस्टल आणि सोन्याचे झुंबर, सोन्याने सजवलेले स्तंभ, सुंदर कोरीव काम केलेली छत, बुद्धिबळ नमुन्याचा संगमरवरी मजला असे वैभवशाली घटक दिसून येतात. या बॉलरूमचा डिझाईन व्हाईट हाऊसच्या पारंपरिक वास्तुकलेशी सुसंगत असेल आणि एकावेळी सुमारे 650 पाहुण्यांना बसवण्याची क्षमता असेल, जी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या ईस्ट रूमच्या क्षमतेपेक्षा तीनपट अधिक आहे. या बॉलरूममध्ये दक्षिण लॉनकडे तोंड असलेल्या तीन भिंतींवर कमानदार मोठ्या खिडक्या असतील, ज्यामुळे भव्यतेसह निसर्गसौंदर्यही पाहता येईल.

या संदर्भात राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले, “हा बॉलरूम देशभक्त दात्यांच्या, अमेरिकी कंपन्यांच्या आणि माझ्या स्वतःच्या सहकार्याने बांधण्यात येत आहे, आणि अमेरिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहेल.” ट्रम्प यांनी याआधीही व्हाईट हाऊसच्या परिसरात अनेक बदल केले आहेत, ज्यामध्ये मोठे ध्वजस्तंभ बसवणे, ‘रोज गार्डन’चे नव्याने डिझाइन करणे, ओव्हल ऑफिसमध्ये सोन्याच्या सजावटीचा समावेश करणे या गोष्टींचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande