नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.)अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की, त्यांचा १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघ नोव्हेंबरमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील ब संघांच्या युवा तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी भारताचा दौरा करेल. ही मालिका १७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे.
ही मालिका १७ नोव्हेंबर रोजी भारताच्या १९ वर्षांखालील अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील ब यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. तर अफगाणिस्तानचा पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी भारताच्या १९ वर्षांखालील ब संघाविरुद्ध होणार आहे. ही तिरंगी मालिका डबल राउंड-रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक संघ चार सामने खेळेल. आणि अव्वल दोन संघ ३० नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत पोहोचतील.
हा दौरा अफगाणिस्तानच्या बांगलादेश मालिकेनंतर आहे. आणि २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप आणि आयसीसी पुरुष अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी संघाच्या तयारीचा एक भाग आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान म्हणाले, आयसीसी अंडर-१९ विश्वचषक जवळ येत आहे आणि आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या स्पर्धेसाठी आमच्या संघाची तयारी करत आहोत. खोस्त आणि नांगरहार प्रांतात अनेक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची मालिका आणि भारतात होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसह आंतरराष्ट्रीय दौऱ्यांद्वारे या तयारीला आणखी बळकटी दिली जात आहे. मला आशा आहे की हे आंतरराष्ट्रीय अनुभव आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी आमच्या भावी स्टार खेळाडूंना एक उत्तम स्पर्धात्मक वातावरण प्रदान करतील.
दरम्यान, अफगाणिस्तान अंडर-१९ संघ सोमवारी बांगलादेशला रवाना होईल, जिथे आठवडाभर चालणाऱ्या कंडिशनिंग कॅम्पनंतर, ते २८ नोव्हेंबरपासून बोगुरा येथे यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळतील.
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
१७ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'अ' विरुद्ध भारत अंडर-१९ 'ब'
१९ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'ब' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-१९
२१ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-१९
२३ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'अ' विरुद्ध भारत अंडर-१९ 'ब'
२५ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'ब' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-१९
२७ नोव्हेंबर: भारत अंडर-१९ 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-१९
३० नोव्हेंबर: अंतिम सामना
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे