आत्मसमर्पण करणाऱ्यांवर केंद्रीय समितीची कारवाई
गडचिरोली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : नक्षलवादी चळवळीतील एकेकाळचा कणा मानला जाणारा मल्लोजुला वेणूगोपाल उर्फ 'सोनू' उर्फ 'भूपती' याला नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने संघटनेतून अधिकृतपणे निष्कासित केले आहे. शासनाच्या आत्मसमर्पण आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या भूपतीसह अन्य नेत्यांवरही कारवाई करत समितीने एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.
भूपतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर लवकरच छत्तीसगडमध्ये सतीश नावाच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने सुमारे 200 माओवादी हस्तकांसह शरणागती पत्करली होती. या घटनांनी संतप्त झालेल्या नक्षल नेतृत्वाने भूपती, सतीश आणि त्यांच्या सोबत आत्मसमर्पण केलेल्या एकूण 271 माओवाद्यांना संघटनेतून निष्कासित केल्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय समितीने जारी केलेल्या पत्रकात भूपती आणि सतीश यांना 'गद्दार' ठरवले असून, त्यांनी पोलिसांशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला 2011 पासूनच भूपतीबाबत शंका होती. त्याचे पोलिसांशी संबंध होते, हे आता स्पष्ट झाले आहे, असे समितीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
समितीने पुढे म्हटले आहे की, भूपती व सतीश यांनी केवळ आत्मसमर्पण केले नाही, तर त्यांनी माओवादी संघटनेच्या महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांचाही पोलिसांकडे खुलासा केला आहे. अशा संधीसाधू व स्वार्थी नेत्यांनी माओवादी संघर्षाच्या विश्वासार्हतेला धोका दिला आहे.
केंद्रीय समितीने हेही स्पष्ट केले आहे की, भूपती व सतीशला त्यांच्या गद्दारीची योग्य शिक्षा दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना माफ केले जाणार नाही. मात्र, आत्मसमर्पण केलेले इतर कार्यकर्ते भविष्यात माओवादी संघटनेत परत येऊ इच्छित असल्यास त्यांचा विचार केला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्या निवेदनाच्या शेवटी सांगितले आहे की, पोलीस आणि सुरक्षाबलांविरुद्धचा आमचा शस्त्रसज्ज संघर्ष सुरूच राहणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर