स्वित्झर्लंडमधील पर्यावरण संस्थेचा दावा
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळीत फटाक्यांच्या वापरानंतर दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर बनल्याचा दावा स्वित्झर्लंडची पर्यावरण संस्था आयक्यू-एअरने केला आहे. दिल्लीतील हवामानाची गुणवत्ता मंगळवारी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली होती आणि तिची मोजणी (रीडिंग) जगभरात सर्वाधिक होती असे आयक्यू-एअरने म्हंटले आहे.
आयक्यू-एअरच्या आकडेवारीनुसार, नवी दिल्लीसाठी प्रदूषणाचे मोजमाप 442 एक्यूआय होते, ज्यामुळे भारताची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित महानगर ठरली. यामध्ये पीएम 2.5 चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वार्षिक मार्गदर्शक मर्यादेपेक्षा 59 पट अधिक होते.
पीएम 2.5 हे हवेत असलेले अतिशय बारीक कण असतात, ज्याचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. हे कण थेट फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतात. यांचे प्रमाण वाढल्यास धुके निर्माण होते आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.
याशिवाय, भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) देखील दिल्लीतील हवामानाची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे जाहीर केले आहे. मोजणीप्रमाणे एक्यूआय 350 इतका नोंदवला गेला आहे. सीबीसीबी नुसार 0 ते 50 एक्यूआय असलेली हवा चांगली मानली जाते.
आगामी काही दिवसांत दिल्लीला दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण अर्थ सायन्सेस मंत्रालयाच्या अंदाजानुसार, हवेची गुणवत्ता अत्यंत खराब ते खराब या श्रेणीतच राहील आणि एक्यूआय पातळी 201 ते 400 दरम्यान राहण्याची शक्यता आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर