तिरुवनंतपुरम, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वीज पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. तिरुवनंतपुरम, कोझिकोड, कन्नूर आणि त्रिशूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान खात्याने 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
केरळच्या अनेक भागांमध्ये सोमवारी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली आणि वाहतुकीवर परिणाम झाला. दक्षिण तिरुवनंतपुरम तसेच उत्तरेकडील कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांतील डोंगराळ भागांमध्ये दिवसभर पावसाची संततधार होती आणि आकाशात ढग दाटले होते. सुमारे एक तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे तिरुवनंतपुरम-तेनकासी मार्गावर पाणी साचले, तर पलोडे येथील एलावट्टम रस्त्यावर संध्याकाळी वाहतूक ठप्प झाली.
कन्नूरमध्ये पूराचे पाणी काही घरांमध्ये आणि दुकानदारांच्या आवारात शिरले. या जिल्ह्यात पावसामुळे एका घरावर भिंत कोसळल्याचीही घटना घडली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील माला आणि एर्नाकुलममधील एलंजी येथे वीज कोसळल्यामुळे घरांचे नुकसान झाले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या घटनांमध्ये घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी झाली आहेत. त्रिशूरमधील पल्लिपुरम येथे एका घरावर झाड कोसळले, मात्र सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले.
दरम्यान, भारत हवामान विज्ञान विभागाने एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कोझिकोड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत भूस्खलन, दरड कोसळणे आणि अचानक पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी