नवी दिल्ली , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी एकीकडे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे काही महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी खास आवाहनही केले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, योगाचा अंगीकार आणि स्वास्थ्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरपासून ते नेक्स्ट जनरेशन सुधारणा पर्यंतच्या मुद्द्यांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीचा आढावा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या पावन दिवाळीच्या सणानिमित्त, आपणा सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य निर्माणानंतर ही दुसरी दिवाळी आहे. प्रभु श्रीराम आपल्याला मर्यादा पाळण्याची शिकवण देतात आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचाही संदेश देतात. याचे जिवंत उदाहरण काही महिन्यांपूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिले. या ऑपरेशनमध्ये भारताने मर्यादा जपत अन्यायाचा योग्यप्रकारे प्रतिकार केला.”
पुढे ते म्हणाले, “ही दिवाळी विशेष आहे कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, दूरदराजच्या भागांमध्ये पहिल्यांदाच दिवाळीचे दीप प्रज्वलित होतील. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशत पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत आपण पाहिले की अनेक लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला आणि भारताच्या संविधानावर आपली निष्ठा प्रकट केली. हे देशासाठी एक मोठे यश आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या ऐतिहासिक यशांपूर्वीच देशात नेक्स्ट जनरेशन सुधारणा सुरू झाल्या आहेत. नवरात्रच्या पहिल्याच दिवशी जीएसटी चे कमी दर लागू करण्यात आले आहेत. या जीएसटी बचत उत्सवामुळे देशवासीयांचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत.”
पुढे ते म्हणाले, “अनेक संकटांचा सामना करत असलेल्या जगात, आपला भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून पुढे आला आहे. लवकरच आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात, एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे कि आपण देशासाठी आपले कर्तव्य पार पाडावे, आपण स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करावा आणि अभिमानाने म्हणावे, ‘हे स्वदेशी आहे’, ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या भावनेला चालना द्यावी, प्रत्येक भाषेचा आदर करावा, स्वच्छता पाळावी, आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, अन्नात तेलाचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करावे, आणि योग अवलंबावा हे सर्व प्रयत्न आपल्याला वेगाने विकसित भारताकडे घेऊन जाणार आहेत.”
आपल्या पत्राच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले, “दिवाळी आपल्याला शिकवते की, एक दिवा दुसऱ्या दिव्याला उजळवतो, तरीही स्वतःचा प्रकाश कमी होत नाही, तर वाढतोच. ह्याच भावनेतून, या दिवाळीत आपण आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला सद्भावना, सहकार्य आणि सकारात्मकतेचे दीप प्रज्वलित करूया. आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode