टोकियो , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।जपानच्या संसदेनं मंगळवारी अतिशय रूढीवादी विचारसरणीच्या साने ताकाइची यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवडून दिलं आहे. ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ (एलडीपी) च्या प्रमुख असलेल्या ६४ वर्षीय ताकाइची या पंतप्रधानपदी शिगेरू इशिबा यांची जागा घेतील, ज्यांना दोनदा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला.
पंतप्रधान पदासाठी संसदेत झालेल्या मतदानात ताकाइची यांना २३७ मते मिळाली, जी बहुमतासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा ४ अधिक होती. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रमुख विरोधी पक्ष ‘कॉनस्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी’च्या नेत्या योशिको नोडा यांना १४९ मते मिळाली. ओसाका आधारित दक्षिणपंथी ‘जपान इनोव्हेशन पार्टी’सोबत एलडीपीने अचानक केलेल्या गठबंधनामुळे ताकाइची यांची पंतप्रधानपदाची निवड निश्चित झाली, कारण विरोधक एकत्रित होऊ शकले नाहीत. तरीसुद्धा ताकाइची यांचं गठबंधन संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे कोणताही कायदा पास करण्यासाठी त्यांना इतर विरोधी गटांचा आधार घ्यावा लागेल. हे सरकारच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकतं आणि सरकार अल्पजीवी ठरू शकतं.
ताकाइची यांच्या नावावर संसदेनं शिक्कामोर्तब केल्याने एलडीपीच्या भीषण निवडणूक पराभवानंतर गेले तीन महिने सुरू असलेलं राजकीय शून्य संपुष्टात आलं आहे. ताकाइची यांच्या पक्षाने एक दिवस आधीच ‘जपान इनोव्हेशन पार्टी’ या नवीन सहयोगी पक्षासोबत संसदेमध्ये बहुमतासाठी गठबंधन केलं, ज्यामुळे त्यांचं सरकार आणखी दक्षिणपंथाकडे झुकणारे होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गठबंधनानंतरही ताकाइची यांना पंतप्रधान होण्यासाठी अजून दोन मतांची गरज होती, जी त्यांनी मिळवली. यापूर्वी एक वर्ष पंतप्रधान पदावर राहिलेल्या इशिबा यांनी मंगळवारीच आपल्या मंत्रिमंडळासह राजीनामा दिला, त्यामुळे ताकाइची यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला.
जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शिष्या असलेल्या ताकाइची यांना “आयरन लेडी” म्हणून ओळखलं जातं. १९६१ साली नारा प्रांतात जन्मलेल्या ताकाइची यांचे कुटुंब राजकारणापासून दूर होतं. त्यांचे वडील एक कार्यालयीन कर्मचारी होते, तर आई पोलीस अधिकारी होत्या. त्यांना १९८० च्या दशकात, अमेरिका-जपान व्यापार तणावाच्या काळात, राजकीय प्रेरणा मिळाली. १९९६ मध्ये एलडीपीच्या तिकिटावर त्यांनी संसदेची निवडणूक जिंकली. तेव्हापासून त्यांनी १० वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे आणि केवळ एकदाच पराभव स्वीकारावा लागला. ताकाइची या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची मोठी चाहती आहेत, आणि स्वतःही जपानची ‘आयरन लेडी’ बनण्याचं स्वप्न पाहत होत्या.
ताकाइची या दीर्घकाळापासून एक कट्टर रूढीवादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात.समलैंगिक विवाहाला त्या विरोध करतात. ज्या कायद्याने विवाहित जोडप्यांना वेगवेगळी आडनावं ठेवण्याची मुभा दिली जाते, त्यालाही त्या विरोध करतात. इमिग्रेशनबाबतही त्यांचा दृष्टिकोन अत्यंत कठोर आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “नियम तोडणाऱ्या विदेशी पर्यटकांवर व स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode