इस्लामाबाद, 21 ऑक्टोबर (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणतेही अधिकृत कारण न देता मोहम्मद रिझवानकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतले आहे. त्यांच्या जागी बोर्डाने पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई शाहिन आफ्रिदीवर विश्वास दाखवला आहे. पीसीबीने त्याची नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
शाहिन आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. जानेवारी २०२४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात २५ वर्षीय वेगवान गोलंदाजाला टी२० स्वरूपात कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती.परिस्थिती अशी होती की, त्या काळात न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत पाकिस्तानला ४-१ असा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.
मोहम्मद रिझवानच्या कर्णधारपदाच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने एकूण २० एकदिवसीय सामने खेळले. दरम्यान, पाकिस्तानी संघाने नऊ सामने जिंकले आणि अकरा गमावले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाच्या विजयाचा टक्का ४५% होता.
कर्णधार म्हणून रिझवानच्या फलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आपल्या संघासाठी १८ डावांमध्ये ४१.६६ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या. त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकेही झळकावली. १२२ धावांचे नाबाद शतक हे कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे