नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर (हिं.स.) इटलीचा टेनिसपटू यानिक सिनरने यावर्षीच्या डेव्हिस कप फायनलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. गतविजेत्या इटलीने आपल्या संघाची घोषणा करताना सिनर खेळणार नसल्याची माहिती दिली. जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणारा कार्लोस अल्कारज या स्पर्धेत स्पेनचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिनरने गेल्या वर्षी स्पेनमध्ये इटलीच्या विजेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण यावेळी तो १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान इटलीच्या बोलोन्या येथे होणाऱ्या अंतिम ८ मध्ये खेळणार नाही.इटलीचा कर्णधार फिलिपो वोलांद्री म्हणाला, यानिक सिनरने २०२५ साठी त्याची उपलब्धता जाहीर केलेली नाही. डेव्हिस कप नेहमीच त्याचे घर असेल आणि मला विश्वास आहे की, तो लवकरच संघाचा भाग असेल. दरम्यान, आमच्याकडे एक मजबूत संघ आहे जो पूर्ण ताकदीने खेळेल.
इटालियन संघात मॅटेओ बेरेटिनी, सिमोन बोलेली, फ्लेव्हियो कोबोली, लोरेन्झो मुसेट्टी आणि आंद्रिया वाव्हासोरी यांचा समावेश आहे. सिनरने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन जिंकले आणि चारही ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डेव्हिस कपच्या एक आठवडा आधी तो ट्यूरिन येथे होणाऱ्या एटीपी फायनल्समध्ये आपले विजेतेपद राखेल. अल्कारज देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
स्पेनच्या संघात कार्लोस अल्काराजसह हायमा मुनार, पेड्रो मार्टिनेझ आणि मार्सेल ग्रॅन्योयर्स यांचा समावेश आहे. २०१९ नंतर स्पेनला पहिले डेव्हिस कप विजेतेपद मिळवून देण्याचे अल्काराजचे ध्येय असेल.दरम्यान, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह देखील पहिल्यांदाच डेव्हिस कप फायनलमध्ये सहभागी होणार आहे. त्याची जर्मनीच्या संघात निवड झाली आहे.
डेव्हिस कप अंतिम ८ ड्रॉ (सीड नंबरसह)
क्वार्टर-फायनल १: पहिला इटली विरुद्ध ऑस्ट्रिया
क्वार्टर-फायनल २: तिसरा फ्रान्स विरुद्ध बेल्जियम
क्वार्टर-फायनल ३: स्पेन विरुद्ध चौथा चेक रिपब्लिक
क्वार्टर-फायनल ४: अर्जेंटिना विरुद्ध दुसरा जर्मनी
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे