रायगड - जिल्हा परिषदेतील घोटाळ्याने घेतला जीव; आरोपी वरुडे यांची आत्महत्या
रायगड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेतील गाजलेल्या वेतन फरक घोटाळ्यातील आरोपी ज्योतीराम पांडुरंग वरुडे (वय ५२) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे १२ ऑक्टोबर रोजी उपचा
वेतन फरकातील अपहार प्रकरणात आरोपीचा मृत्यू; प्रशासनावर संशयाची छाया!”


रायगड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेतील गाजलेल्या वेतन फरक घोटाळ्यातील आरोपी ज्योतीराम पांडुरंग वरुडे (वय ५२) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे १२ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या वरुडे यांचा २० ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी अश्विनी वरुडे यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

वरुडे हे जिल्हा परिषदेमधील कोट्यवधी रुपयांच्या वेतन फरक घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक होते. त्यांच्या आत्महत्येमुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरुडे यांनी मृत्यूपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली असून त्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद केल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून या बाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

मागील आठ महिन्यांपासून अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे हे या घोटाळ्याचा तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी वरुडे यांची बदली अलिबागहून माणगाव पंचायत समितीकडे झाली होती. तिथेच त्यांनी १२ ऑक्टोबर रोजी विषप्राशन केले, असे समजते. डॉक्टरांनीही विषप्राशन झाल्याची पुष्टी दिली आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तपास मुंबई किंवा नवी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. वरुडे यांच्या आत्महत्येनंतर सावंत यांनी पुन्हा ही मागणी पुनरुच्चारित केली असून, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि बालविकास विभागांतील कर्मचाऱ्यांनी बनावट वेतन देयके तयार करून तब्बल ₹५.३५ कोटींचा अपहार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी एफआयआर क्रमांक ३३/२०२५ नोंदवला होता. मुख्य आरोपी नाना कोरडे याला अटक झाली होती, तर वरुडे आणि महेश मांडवकर यांच्या अटकपूर्व जामिन अर्जाला अलिबाग सत्र न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही, असे स्पष्ट नमूद केले होते. वरुडे यांच्या आत्महत्येमुळे या प्रकरणाचा तपास आणखी गडद झाला असून, संपूर्ण जिल्हा परिषदेतील कारभारावर संशयाचे सावट पसरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande