सोलापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)एका सराईत गुन्हेगाराने आपल्याकडील देशी पिस्तुलची विक्री करण्याकरिता माढा गावात आले असता, ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराकडील एका देशी बनावटीच्या पिस्तूलसह चार जिवंत काडतूस आणि दोन मॅग्झीन असे मिळून एकूण एक लाख दहा हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सराईत गुन्हेगारालाही ताब्यात घेतले आहे.
माढा गावात आपल्या ताब्यातील देशी बनावटीची पिस्टलची विक्री करण्यासाठी मुंगसीतील आपल्या घराकडून हणमंत बापू महाडीक हा सराईत गुन्हेगार मुंगशी ते कव्हे या रोडवरून दुचाकीने कुडूवाडीकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे आपल्या पथकासह कुर्डूवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी पेट्रोलिंग करीत असतानाच तो मुंगशी ते कव्हे या संत एकनाथ महाराज पालखी मार्गालगतच्या संभाजी माळी यांचे शेताजवळ बिटरगावाहून एक इसम येताना पोलिसांना दिसला. संशय आल्याने त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा, त्याला पोलिसांनी गराडा घालून पकडले. त्याला नाव व पत्ता विचारताच त्याने नाव हणमंत बापू महाडिक (वय 30, रा. मुंगशी) असल्याचे सांगितले. त्याला तपासले असता एक देशी बनावटीची पिस्टल मिळाले. पिस्टलची मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड