परभणीत स्वरमयी दीपावलीच्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
परभणी, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिका व अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरमयी दीपावली – २०२५’ या सांस्कृतिक उपक्रमाला परभणीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने वस्मत रोडवरील राजगोपालचारी उद
परभणीत ‘स्वरमयी दीपावली – २०२५’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध


परभणी, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिका व अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरमयी दीपावली – २०२५’ या सांस्कृतिक उपक्रमाला परभणीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने वस्मत रोडवरील राजगोपालचारी उद्यानात पार पडलेल्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाने शहरातील सांस्कृतिक वातावरण अधिक सुरेल केले.

या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. नागेश आडगावकर यांनी आपल्या अप्रतिम गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना साथसंगत म्हणून मंगेश जवळेकर (हर्मोनियम), प्रशांत गाजरे (तबला), पंकज शिरभाते (व्हायोलीन), विश्वेश्वर कोलंबीकर (पक्षवाज) आणि अनाहत वारसी (बासरी) यांनी दिली.

संगीताच्या सुरावटींसह रंगांची उधळण करत प्रा. सिद्धार्थ नागठाणकर यांनी लाईव्ह पेंटिंगद्वारे दृश्यात्मक कलात्मक अनुभव साकारला. सूर आणि रंग यांचा हा संगम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, तसेच सणासुदीच्या वातावरणात बाहेरगावी स्थायिक परभणीकरांनीही आपल्या शहरातील सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद लुटावा, या हेतूने ‘स्वरमयी दीपावली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अनिकेत सराफ यांनी दिली. संगीत, कला आणि संस्कृतीचा संगम ठरलेला हा ‘स्वरमयी हिवाळी पहाट’ कार्यक्रम परभणीकरांच्या दीपावली साजरी करण्याच्या आनंदात सुरेल स्वरांची भर घालणारा ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande