जेरुसलेम, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि ट्रम्प प्रशासनाचे पश्चिम आशियातील दूत स्टीव्ह विटकॉफ सध्या तेल अवीवमध्ये आहेत. अलीकडेच वेंस यांनी हमासला इशारा दिला होता की जर हमासने सहकार्य केले नाही, तर त्याचे अस्तित्व संपवले जाईल. त्याचबरोबर त्यांनी इस्रायलला युद्धविराम कराराबाबत थोडे संयम ठेवण्याचा सल्लाही दिला होता.
जेडी वेंस यांनी गाझा सीजफायरबाबत आशावादी दृष्टिकोन व्यक्त करताना म्हटले की, परिस्थिती अपेक्षेपेक्षा चांगली आहे. त्यांनी इस्रायलमधील नागरी आणि लष्करी सहकार्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या केंद्राला भेट दिल्यानंतर हे वक्तव्य केले. वेंस यांनी मान्य केले की अलीकडे काही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, पण दोन वर्षे चाललेल्या इस्रायल-हमास युद्धानंतर लागू झालेल्या युद्धविरामात अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती झाली आहे. त्यांना विश्वास आहे की ही शांती दीर्घकाळ टिकेल.
ट्रम्प प्रशासनाचे पश्चिम आशियातील दूत स्टीव्ह विटकॉफ म्हणाले, “आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आहोत, जिथपर्यंत पोहोचणे याआधी अशक्य वाटत होते.” वेंस, विटकॉफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर हे तिघेही युद्धविरामावर मंडरलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये पोहोचले आहेत.
हमास शस्त्रे खाली ठेवेल का, गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल केव्हा आणि कसे तैनात केले जाईल, आणि युद्धानंतर या प्रदेशाचे प्रशासन कोण करेल? या कराराबद्दल असे अनेक प्रश्न अजूनही निर्माण झाले आहेत.दरम्यान, जॅरेड कुशनर यांनी म्हटले, “दोन्ही बाजू दोन वर्षांच्या भयंकर लढाईनंतर आता शांततेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
वेंस गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू आणि इतर अधिकाऱ्यांशी भेट घेणार आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम १० ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. मात्र त्यानंतरही गाझामध्ये काही हल्ले झाले आणि इस्रायली सैनिकांनाही लक्ष्य केले गेले. या घटनांमुळे गाझामधील युद्धविरामाबाबत संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. तरीदेखील इस्रायल आणि हमास दोघांनीही जाहीर केले आहे की ते या करारासाठी पूर्णतः कटिबद्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode