आसियान शिखर परिषदेला मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार- मलेशियाचे पंतप्रधान
क्वालालंपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारपासून मलेशियामध्ये सुरू होणाऱ्या ४७व्या आसियान शिखर परिषदेसाठी क्वालालंपूरला प्रत्यक्ष जाणार नाहीत, तर ते या परिषदेत ‘व्हर्च्युअली’ म्हणजेच ऑनलाइन सहभागी होतील. मलेशियाचे पंतप्रधान अन
४७व्या आसियान शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार- मलेशियाचे पंतप्रधान


क्वालालंपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारपासून मलेशियामध्ये सुरू होणाऱ्या ४७व्या आसियान शिखर परिषदेसाठी क्वालालंपूरला प्रत्यक्ष जाणार नाहीत, तर ते या परिषदेत ‘व्हर्च्युअली’ म्हणजेच ऑनलाइन सहभागी होतील. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी याची पुष्टी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचा आदर व्यक्त केला.ही शिखर परिषद २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे.

अन्वर इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदींच्या एका निकटवर्तीय सहकाऱ्याशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर सांगितले, “आपण या अखेरीस क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या ४७व्या आसियान शिखर परिषदेच्या आयोजनाबद्दल चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की सध्या भारतात दीपावली साजरी होत असल्यामुळे पंतप्रधान मोदी परिषदेत ऑनलाइन सहभागी होतील.” मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले,“मी त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो आणि त्यांना तसेच भारतातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.”

अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांवरही चर्चा झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “काल रात्री मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहकाऱ्याचा फोन आला. या संभाषणात मलेशिया-भारत संबंध अधिक धोरणात्मक आणि व्यापक स्तरावर मजबूत करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली.” अन्वर म्हणाले,“भारत हा व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात मलेशियाचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. तसेच तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षेच्या क्षेत्रातदेखील भारत आमचा निकट सहकारी आहे.”

दरम्यान, ४७व्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील मलेशियाला जाणार आहेत. ट्रम्प मलेशियाबरोबरच दक्षिण कोरिया आणि जपानचाही दौरा करतील. दक्षिण कोरियामध्ये ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही भेट होणार आहे. ट्रम्प यांनी बुधवारी मलेशिया दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली आणि त्याच वेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत होणारी नियोजित बैठक सध्या रद्द केल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande