जळगाव , 3 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील पिंप्राळा भागातील गणपती नगर येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मध्यरात्री १२:३० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कुटुंबीयांनी मनहेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस तपास करत आहेत.
कृष्णा राहुल सोनवणे (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुंबई येथे वडिलांसोबत राहून इयत्ता अकरावीला शिकत होता. कृष्णाचे आई-वडील विभक्त झाले असून, वडील मुंबईत तर आई पिंप्राळा हुडको परिसरात राहते. कृष्णा आणि त्याचा मोठा भाऊ मुंबईत वडिलांकडेच राहतात. दोन दिवसांपूर्वीच आईला भेटण्यासाठी तो जळगावला आला होता. गुरुवारी रात्री राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची कल्पना येताच कुटुंबीयांनी कृष्णाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती आणि कुटुंबीयांना गंभीर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाची लाट उसळली असून, शेजारील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर